२२ जुलै रोजी राज्यभरात होणार अभिवादन कार्यक्रम
शासनाने जारी केलेल्या परिपत्रकातील निर्देशानुसार, येत्या २२ जुलै, २०२६ (बुधवार) रोजी दिवंगत अजित अनंतराव पवार यांची जयंती राज्यभरात शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे.
शाळा आणि महाविद्यालयांनाही आदेश लागू
हा शासकीय निर्णय केवळ सरकारी कार्यालयांपुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व महाविद्यालये आणि सर्व शाळांनाही अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व शैक्षणिक संस्थांमध्येही २२ जुलै रोजी अजितदादांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केले जातील.
प्रशासनाला तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश
सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव हेमंत महाजन यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या भागातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आले आहे.
अजितदादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रशासनावरील पकड आणि लोककल्याणकारी कामांच्या माध्यमातून जनमानसात अढळ स्थान निर्माण केले होते. शासनाच्या या निर्णयामुळे आता दरवर्षी २२ जुलै रोजी त्यांच्या लोकसेवेच्या वारशाचे शासकीय स्तरावर स्मरण केले जाईल.
टिप्पणी पोस्ट करा